महाविकास आघाडीच्या नादी लागल्यामुळे उद्धव ठाकरेंवर धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली- रामदास आठवले

मुंबई – एक कविता सादर करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाविकास आघाडीच्या नादी लागल्यामुळे शिवसेनेचे (Shivsena) निवडणूक चिन्ह गोठविण्याची वेळ पाहण्याची परिस्थिती उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्यावर आली आहे असा टोला लगावला.

आठवलेंची कविता 

निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले 

तेंव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले!

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव गोठवले 

कारण उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या मागे लागून 

एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले!       

शिवसेना भाजप यांची 25वर्षांची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसशी महाविकास आघाडी करण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय अयोग्य होता. ती चुक दुरुस्त न केल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत आहे. निवडणूक आयोगाने अंतरिम निर्णय देऊन धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. मात्र अंतिम निर्णयावेळी बहुमत गटाकडे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह दिले जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह जपण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले बहुमत सिद्ध करून करतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.