… तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला किमान १०० जागा जिंकाव्या लागतील – वागळे

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सतत देशभरात दौरे करत आहेत आणि बिगर काँग्रेस विरोधी पक्षांच्या भेटी घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचे ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत. यूपीए आता अस्तित्वात राहिली नाही, काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी निर्माण करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता बँनर्जी म्हणाल्या होत्या की, काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही. जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? असा खोचक सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र असतील तर भाजपला पराभूत करणे सोपे जाईल. राज्यात परिस्थिती चांगली असली तरी मला बंगालमधून बाहेर पडावे लागले जेणेकरून इतरही बाहेर पडतील आणि त्यांना स्पर्धा करता येईल,असे ममता म्हणाल्या.

दरम्यान, आता या सर्व घडामोडींवर जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केलेले एक ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. वागळे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘युपीए आहे कुठे?’असं विचारुन ममता बॅनर्जींनी शरद पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला झटका दिला आहे. त्याला उत्तर द्यायचं असेल तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला किमान १०० जागा जिंकाव्या लागतील.आहे का एवढा आत्मविश्वास? असा सवाल देखील त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाला विचारला आहे.