भारत दौऱ्यावर आलेल्या डेविड मिलरवर कोसळला दु:खाचा डोंगर, ‘चिमुकली’चे निधन

टी२० विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर असून उभय संघात सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेविड मिलर (David Miller) याला मोठा धक्का बसला आहे. ३३ वर्षीय मिलर याची मानलेली मुलगी आणि खास चाहती एनी (Ane Died) हिचे शनिवारी (०८ ऑक्टोबर) निधन झाले आहे. स्वत: मिलरने सोशल मीडियाद्वारे ही दु:खद बातमी सांगितली आहे.

मिलरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एनीसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मिलर आणि एनीचे कोलाज केलेले फोटो जोडण्यात आलेले आहेत. यातील बऱ्याच फोटोंमध्ये एनीच्या डोक्यावर केस दिसत नाहीयत. यावरून अनेकांनी असा अंदाज लावला आहे की, एनी कँसरशी झुंज देत होती आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

मिलरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “माझी स्कट, मी तुला खूप जास्त मिस करेल. तू लढण्याच्या तुझ्या जोशाला एका वेगळ्याच स्तरापर्यंत घेऊन गेलीस. तू नेहमीच सकारात्मक राहिलीस आणि चेहऱ्यावर सतत हास्य ठेवलेस. तू मला खूप काही शिकवले आहे.” एनी मिलरच्या जवळच्या लोकांपैकी एक होती. मिलर तिला आपल्या मुलीप्रमाणे मानत असे.