अमित शाहाला तुरुंगात पाठवलं, मोदीजींची चौकशी तुम्ही केली,त्यामुळे …; दानवे यांची विरोधकांवर टीका

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल, जिथे एजन्सी त्याची कोठडी मागणार आहे. त्याच्या अटकेपूर्वी, ईडीने राऊतच्या भांडुप निवासस्थानाची नऊ तासांहून अधिक काळ झडती घेतली आणि नंतर मग मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व घडत असताना विरोधक भाजपवर टीका करत आहेत. या टीकेचा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला आहे. ईडीने त्यांच्यावर जी कारवाई केली आहे, त्या कारवाईला त्यांनी कायदेशीर तोंड द्यावं. या विषयाला उगीच राजकीय रंग देऊ नये. आमच्या काळात ईडीचा गैरवापर असं म्हणत असतील, तर काँग्रेसच्या काळात लालूप्रसाद यादव तुरूंगात गेले होते. सुरेश कलमाडींची चौकशी झाली होती. अमित शाहाला तुम्ही तुरुंगात पाठवलं होतं. मोदीजींची चौकशी तुम्ही केली होती. त्यांच्या काळात चौकशा झाल्या नाहीत, असं थोडी आहे, असं उत्तर रावसाहेब दानवे यांनी दिलं.

ईडी आणि सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. त्यामध्ये सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे ही जी कारवाई झाली आहे, ती कुठे न कुठे त्यांना (ईडी) पुरावे मिळाल्याशिवाय अशा प्रकारची कारवाई ईडी करणार नाही, असं मला स्वतःला वाटतं, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.