गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, चित्रा वाघ आक्रमक

मुंबई : सध्या राज्यभरात नगरपंचायत निवडणूकींची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली आहे.

गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. ही टीका करताना गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्याने आता नवा वाद उभा राहिला आहे.

‘माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता’, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केलाय.

गुलाबराव पाटील यांच्या या बेताल वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही…मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा.. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.