‘हा’ विश्वविजेता दिग्गज बनणार बीसीसीआयचा नवा ‘दादा’? गांगुलीची घेऊ शकतो जागा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय, BCCI) अध्यक्षपदी (BCCI President) नव्या दिग्गजाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. माजी भारतीय कर्णधार आणि क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. ‘दादा’ नंतर बोर्डाचे अध्यक्षपद नव्या व्यक्तीकडे सोपवले जाऊ शकते. नव्या बीसीसीआय अध्यक्षाच्या (New BCCI President) निवडीसंदर्भात गुरुवारी (०६ ऑक्टोबर) दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली आहे. य बैठकीनंतर एक नाव चर्चेत आले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, दिल्लीत झालेल्या बोर्डाच्या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिन जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ, आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेलसहित बरेच मोठे अधिकारी सहभागी झाले होते.

या बैठकीनंतर गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडू शकतो आणि बोर्डाला नवीन अध्यक्ष मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. मात्र बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत जय शाहचे नाव नसून एका विश्वविजेत्या क्रिकेटपटूचे नाव आघाडीवर आहे. हे क्रिकेटपटू अजून कोण नसून रॉजर बिन्नी (Roger Binny) आहेत. 

वृत्तसंस्था एएनआयनुसार, १९८३ सालच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य राहिलेले माजी दिग्गज क्रिकेटपटू रॉजर बिन्नी हे गांगुलीची जागा घेऊ शकतात. ते बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असून लवकरच बीसीसीआय यासंदर्भात अधिकृत घोषणाही करू शकते.

गांगुलीचा लवकरच संपतोय कार्यकाळ
गांगुली २३ ऑक्टोबर २०१९ पासून बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. तर जय शाह २४ ऑक्टोबर २०१९ ला बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्त झाला होता. या दोघांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२२ ला संपणार आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेनंतर बीसीसीआयशी संबंधित संविधानात शोधाशोध केली गेली. ज्यानुसार, गांगुली आणि शाह यांची इच्छा असल्यास त्यांचा कार्यकाळ २०२५ पर्यंत वाढवता येऊ शकतो. परंतु माध्यमांतील वृत्तांनुसार, गांगुली स्वत: अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत आहे.