सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला होता हे त्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेतल्याने स्पष्ट झाले – पाटील

मुंबई – ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर (Silver Oak) हल्ला केला ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले, याचा अर्थ सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी त्यांना कुणी फुस लावली होती हे लक्षात येते. असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना आपले मत व्यक्त केले.

आई-वडिलांना शिव्या देणे अत्यंत चुकीचे आहे. मराठी माणसे असे कधीही करत नाही. चंद्रकांत पाटील यांना आई-वडिलांना शिव्या द्या, असे सांगणे हे योग्य आहे असे मला वाटत नाही. मोदी – शहांची तुलना आई-वडिलांशी करणे हे तर अत्यंत चुकीचे आहे. हे हिंदू संस्कृतीमध्ये बसत नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू होती. त्या प्रकरणात नेमके काय समोर आले आहे आणि क्लोजर रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे? हे पाहिल्याशिवाय त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. जर क्लीनचीट दिली असेल तर त्यामध्ये त्याची कारणे लिहिली असतील, असेही जयंत पाटील म्हणाले.

आमदार वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही, ते निष्ठावंत आहेत. कदाचित त्यांनी साथ सोडावी यासाठी दबाव आणला जात आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. निवडणूका जवळ आल्या की, अशी काही विधाने करायची आणि त्या वर्गाला चुचकारायचं अशी स्ट्रॅटेजी काही जणांची असू शकते. मी मोहन भागवत यांच्याबाबत बोलत नाहीत. मात्र मधल्या काळात ते मुस्लिम धर्मगुरूंना देखील भेटले होते, असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या सभेने खरी शिवसेना कुणाची हे स्पष्ट झाले आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचेच आहे. जर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिले, तर त्यांच्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केले जाईल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. शिंदे गटाच्या सभेला एवढा खर्च करण्यात आला. लोकांना अक्षरशः कोंबून मुंबईला आणले. त्यांना माहिती देखील नव्हती असे सांगतानाच या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.