‘…म्हणून गौतमी पाटील व उर्फी जावेदवर कोणतीही कारवाई करता येत नाही’, रुपाली चाकणकर यांनी सांगितलं कारण

गौतमी पाटीलचा (Gautami Patil) डान्स आणि उर्फी जावेदचे अतरंगी कपडे हे महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय आहेत. गौतमीच्या अश्लील डान्सवरुन आणि उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून बरचं राजकारण झालं. दरम्यान, या दोघींबद्दल राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाष्य केलं आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

गौतमी पाटील आणि उर्फी जावेद महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विकृतीकरण करत आहेत का? असा प्रश्न रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “गौतमी काय करते ते नृत्य नाही, पण या प्रकरणात राज्य महिला आयोगाला ज्या तक्रीरी प्राप्त होतात, त्या तक्रारीची दखल घेऊन महिला आयोग संबंधित व्यक्ती, संबंधित विभाग किंवा संस्था यांच्याकडे पाठवत असते. मात्र राज्यघटनेने तुम्हाला, मला जो व्यक्ती स्वातंत्र्याचा, भाषा स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणी काय घालवं, काय बोलाव आणि काय खावं, हे कोणी कोणाला सांगू शकत नाही.”

“घटना तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असताना शील व अश्लील याची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल तर दुसऱ्याला ती गोष्ट शील वाटते. त्यामुळे ही परिभाषा स्थळ, काळ वेळपरत्वे बदलत राहते. याबाबत कोणतीही स्पष्ट व्याख्या कायद्यात नाही,” असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

“गौतमी आणि उर्फी या दोघीही तुमच्या दृष्टीकोनातून अश्लील वाटत असल्या तरी दुसऱ्यांच्या नजरेत त्या शील असू शकतात. म्हणून आपण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करु शकत नाही, मात्र, त्यांना समज देऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था पाहता त्यासाठीचे काही परिणाम ठरले आहेत. त्यापलीकडे जाऊन आपण कोणती कारवाई करु शकत नाही.” असे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.