सोनिया गांधींनी दिले पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश

नवी दिल्ली-  काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल आणि मोठ्या फेरबदलाच्या चर्चांमध्ये महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या पीसीसी अध्यक्षांना पीसीसीच्या पुनर्रचनेसाठी राजीनामे देण्यास सांगितले आहे. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये अजय कुमार लल्लू हे पीसीसीचे प्रमुख आहेत. याशिवाय उत्तराखंडमध्ये प्रदेश काँग्रेसची कमान गणेश गोदियाल यांच्याकडे आहे. गोव्यात गिरीश चोडणकर हे पीसीसीचे अध्यक्ष होते, त्यांनी गोव्यात काँग्रेसच्या पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मणिपूरमध्ये नामीरकपाईम लोकेन सिंग प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. पराभवानंतर सर्व प्रदेशाध्यक्षांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत सांगितले की, ‘पक्षाच्या हितासाठी आम्ही कोणत्याही त्यागासाठी तयार आहोत. यानंतर, सीडब्ल्यूसीमध्ये समाविष्ट असलेल्या नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि संघटनात्मक निवडणुका संपेपर्यंत त्यांना या पदावर कायम राहण्याचे आवाहन केले.