‘गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा, पवार, ठाकरे यांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी फंडिंग केलं जात आहे’

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी काल  हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मश्गुल आहेत. दरम्यान, ‘हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले की, ‘मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. पोलिसांना हे आधी कसं कळलं नाही. तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही.’असं म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला या घटनेनंतर या सर्वांच्या पाठीमागे वकील गुणरत्न सदावर्ते असल्याचा आरोप सत्ताधारी करत असताना खासदार संजय राऊत यांनी या निमित्ताने भाजपवर शरसंधान केले आहे. ते म्हणाले, गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा आहे. विरोधी पक्षाच्या दळभद्रीपणाचा कळस आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठी फंडिंग केलं जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ज्या लोकांना पवारांनी मोठं केलं तेच पवार यांच्याविरोधात बोलत होते. बाडगे मोठ्यानं बाग देतात, तो प्रकार आम्ही काल पाहिला, असं राऊत म्हणाले. गुळगुळीत सत्ताकारण आज चालत नाही, असंही ते म्हणाले.