महाराष्ट्राचं राजकारण कधीही इतकं घाणेरडं झालं नव्हतं – आदित्य ठाकरे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक ( Congress leaders oppose attack on Sharad Pawar house ) या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. काल घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,महाराष्ट्राचं राजकारण कधीही इतकं घाणेरडं झालं नव्हतं. असं कुणाच्याही घरावर आंदोलन झालं नव्हतं. या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी होईल आणि कडक कारवाई केली जाईल अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांवर कारवाई होणार हे स्पष्ट केलंय.