AK47 ने उडवून टाकू, संजय राऊतांना धमकी; पुणे पोलीस अॅक्शन मोड वर 

पुणे – खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना आणखी एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने ‘मी तुला सिद्धू मूसेवाला सारखा मारेन’ असा मेसेज केला होता. यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून त्याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

‘जर तू दिल्लीत सापडलास तर तुला AK47 ने उडवून देईन, सिद्धू मूसेवालासारखा मर्डर केस होईल’, अशी उघड धमकी संजय राऊत यांना मेसेजमध्ये देण्यात आली आहे. ‘सलमान आणि तू फिक्स आहेस’, असे लिहित लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. तो मजकूर संदेश म्हणून प्राप्त झाला आहे. या धमकीभऱ्या संदेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आता संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकर ( वय साधारण 23) या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केली आहे. ही अटक पुण्यातील खराडी भागातून करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई केली आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.