संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार; महिलेने केला दिल्लीत गुन्हा दाखल

नवी दिल्ली : शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रविवारी मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी दोन खासगी TV चॅनेलवर दिलेल्या मुलाखतींमध्ये भाजप कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज (Deepti Rawat Bhardwaj) यांनी मंडवली पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली होती, या मुलाखतीचा व्हिडिओही (Video) पोलिसांना सादर करण्यात आला होता.

खा. शरद पवार (Sharad Pawar) यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

 

दरम्यान, दिप्ती रावत यांच्या तक्रारीवरुन कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भातील काही टीव्ही क्लिपींग देखील दिप्ती रावत यांनी सादर केल्या आहेत. घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदार पद्धतीने वक्तव्य करायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे. आता गुन्हा दाखल झाल्याने राऊत यांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता आहे.