‘कोल्हापूरमध्ये माझ्या पक्षाचा महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख रुपये दिले’

कोल्हापूर- कोल्हापूरमध्ये माझ्या पक्षाचा महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35 लाख रुपये दिले असल्याची कबुली जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी दिली. कोल्हापूरमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्याअनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विनय कोरे यांनी ही कबुली दिली.

आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी जवळपास पंधरा वर्षापूर्वी महापालिकेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यावेळी, नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महाडिकांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली होती.त्यावेळी घडलेल्या घडामोडींवर कोरे यांनी भाष्य केले आहे.

ते म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील एकत्र होते. तर, मी आणि हसन मुश्रीफ एकत्र होतो. त्यावेळी कोल्हापुरात महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले होते.

माझ्या पक्षाचा महापौर झाला. मात्र, लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात मी केलेली ही सर्वात मोठी चुक होती, अशी कबुलीच कोरे यांनी पत्रकारांसमोर दिली. कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.