‘कुंकू (आधुनिक काळात टिकली) लावणे हा हिंदू अथवा वैदिक तर सोडाच भारतीय संस्कृतीचाच भाग नाही’

पुणे – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे विधान केले आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे विधान केले. या वक्तव्यावरून सध्या चांगलेच वातावरण तापले असून जेष्ठ विचारवंत संजय सोनवणी यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.

ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये  म्हणाले , कुंकू (आधुनिक काळात टिकली) लावणे हा हिंदू अथवा वैदिक तर सोडाच भारतीय संस्कृतीचाच भाग नाही. प्राचीन धर्मग्रंथ ते महाकाव्येसुद्धा या प्रथेचा दुरान्वयानेही उल्लेख करत नाहीत. अजंता येथील चित्रे पाहिली तर मध्ययुगापर्यंत ही प्रथा आल्याचे दिसून येत नाही.

संस्कृती प्रवाही असते. तीत बदल होत राहतात. कधीतरी नंतर ही चाल पडली पण ती संस्कृती अथवा कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग म्हणून पडली नाही. आज आधुनिक काळात कुंकू-टिकली लावणे न लावणे ही स्त्रीयांची व्यक्तिगत निवड आहे.

धर्मसंस्कृतीच्या नावाखाली कोणी जोर-जबरदस्ती करत असेल तर अशा इसमाला ना धर्म माहित ना संस्कृती माहित. या अशा अडाणी सांस्कृतिक दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवून देणे आधुनिक समाजाचे कर्तव्य आहे! भारतीय प्रवाही संस्कृतीचे वाटोळे करून तिचे सडलेले वर्चस्वतावादी वैदिक डबके बनवू इच्छिणा-यांपासून सावधान! असं त्यांनी म्हटलं आहे.