संभाजी भिडेंच्या ‘कुंकू लाव’ विधानावर सुप्रिया सुळेंची टीका, फेसबुकवर शेअर केली पोस्ट

पुणे – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे विधान केले आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे विधान केले. या वक्तव्यावरून सध्या चांगलेच वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संभाजी भिडे यांच्यावर टीका केली असून, फेसबुकला हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे.

सुप्रिया सुळेंनी शेअर केली कविता –
तू आणि मी ….?
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू
तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ
तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा
मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल
तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो
मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का…!!!
मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास …..!!!!!

हेरंब कुलकर्णी