प्रतीक्षा संपणार! शिवसेना आमदार अपात्रतेचा आज महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे देशाचे लक्ष

Shiv Sena MLA Disqualification Case :  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ((Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  आज निकाल देणार आहेत. याप्रकरणी 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, तसंच सव्वादोन लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांचं भवितव्य या निकालावर ठरणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल सुनावणार आहेत. या प्रकरणी अनेक संभाव्य निर्णयांची चर्चा सध्या सुरू आहे. यात पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या 40 आमदारांना अपात्र केलं जाऊ शकतं किंवा शिवसेनेत फूट पडलीच नाही केवळ नेतृत्त्वात बदल झाला असं सांगत दोन्हीपैकी एकाही गटाचे आमदार अपात्र ठरणार नाहीत असाही निकाल समोर येऊ शकतो असं जाणकार सांगतात.

परंतु यात जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याचा निकाल आल्यास विद्यमान सरकार धोक्यात येऊ शकतं का? किंवा या निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकार अस्थिर होऊ शकतं का? असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.