संजय राऊतांना मोठा दणका, शिवडी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आपली बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी संजय राऊतांनविरोधात शिवडी कोर्टात याचिका दाखल केली होती.

कोर्टानं समन्स बजावूनही राऊत कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यावरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रं सादर करून हे कंत्राट मिळवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपांप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना याप्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

संजय राऊत यांनी वारंवार आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.