रुपाली चाकणकर यांना भेटणार उर्फी, थोबाड फोडण्याच्या धमकीवरुन चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार करणार?

Mumbai- उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात सुरु असलेले शीतयुद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर आज उर्फी जावेद ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत त्यांच्यात काय चर्चा होते आणि यावर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उर्फी जावेद सार्वजनिक ठिकाणी हिडीस अंगप्रदर्शन करत समाजमनावर विपरित परिणाम करतेय, असा आरोप करतच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसात तक्रारही दाखल केली होती. यानंतर उर्फीनेही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देण्याचा धडाका लावला. या दोघींमधील वाद पेटत असतानाच चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाला उर्फीविरोधात पाऊल उचलण्यास सांगत रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात ओढले. महिला आयोगाच्या भूमिकेवर चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केले. परिणामी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती.

उर्फी करणार चित्रा वाघ यांची तक्रार
आता उर्फी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट (Urfi Javed Meets Rupali Chakankar) घेणार आहे. आज उर्फी महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांना भेटणार आहे. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी उर्फीला थोबाड फोडण्याची धमकी दिली होती. त्याप्रकरणी उर्फी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे म्हटले जात आहे.