परळीच्या जनतेनं औकात दाखवली ते विसरलात का? धनंजय मुंडेंची बोचरी टीका 

बीड- मुंडे बंधू-भगिनी यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. वडवणी येथील प्रचार सभेत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची खिल्ली उडवली. उत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे 32 व्या क्रमांकावर आल्याने पंकजा मुंडे म्हणाल्या, तुमच्या ताई पहिल्या चार मंत्र्यांमध्येच होत्या. 32 व्या नंबरवर कधीही गेल्या नाहीत अशी टीका पंकजा यांनी केली आहे.

निवडणुकीत निवडून आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देऊ, असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं होतं. एक नव्हे तर पाटोदा, शिरूर, आष्टी, केज आणि वडवणी अशा पाचही ठिकाणी त्यांनी ही घोषणा केली होती. एका झटक्यात ५०० कोटी रुपये द्यायला तयार होतात, पण दोन वर्ष उलटूनही निधी मिळाला नाही. मग दोन वर्षे काय टाळं पिटत होते का? असा सवाल करत ते पैसे द्यायची यांची ताकदच नाही,” असा टोला पंकजांनी लगावला.

पंकजा यांच्या या टीकेला धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा तुम्ही २०१९मध्ये निवडणूक लढवली तेव्हा तुम्ही ग्रामविकास मंत्री होत्या. राज्याच्या कॅबिनेट मंत्री होत्या, तरीही परळीच्या जनतेनं तुम्हाला तुमची औकात दाखवून दिली. २०१९चा पराभव तुम्ही विसरलात का?, परळीच्या जनतेनं २०१९मध्ये तुम्हाला औकात दाखवली ते विसरलात का,” अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये प्रत्युत्तर दिलं. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.