माझी भाषणं ऐकण्यासाठी विनायक राऊतांनी त्यांच्या कानातला मळ काढून ठेवावा – शहाजी बापू

सांगोला – शिवसेना खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी रविवारी बंडखोर आमदार शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात जाऊन एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांच्या सरकारची खिल्ली उडवली आहे. यानंतर आता विनायक राऊतांच्या या टीकेला आता बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारचा उल्लेख ‘नाच्याचा खेळ’ असा केला आहे, तर विनायक राऊत त्यात नाचत होते का? असा बोचरा सवाल त्यांनी विचारला आहे.

ते म्हणाले, आज सांगोला येथे खासदार विनायक राऊत यांनी उरल्या-सुरल्या तुटपुंज्या शिवसेनेची सभा घेतली. सांगोला तालुक्यात जिथे शिवसेनेची लाखोंच्या संख्येत मेळावे भरवण्याची ताकद होती, तिथे विनायक राऊतांवर ५०-६० टुकार पोरांच्यात मेळावा घेण्याची वेळ आली आहे.

गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) यांचा ‘नाच्याचा खेळ’ होता आणि विनायक राऊत त्यात नाचत होते का? असं एखादं विधान मी केलं तर त्यांना वाईट वाटायला नको. विनायक राऊतांच्या प्रत्येक मुद्द्याला त्यांच्या मतदारसंघात जाऊन सात तालुक्यात सात सभा घेऊन मी सडेतोड उत्तर देणार आहे. आज ते येथे बोलले म्हणून मी येथेच बोलणं योग्य नाही. कोकणातदेखील माझी भाषणं ऐकण्यासाठी विनायक राऊतांनी त्यांच्या कानातला मळ काढून ठेवावा” अशी टीकाही शहाजीबापू पाटलांनी यावेळी केली.