मोदीजी प्लीज भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने होऊ द्या; आफ्रिदीची मोदींना विनंती 

Shahid Afridi’s Request To PM Modi: यावर्षी खेळल्या जाणार्‍या आशिया कपबाबत (Asia Cup) अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानने केले आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी आधीच स्पष्ट केले आहे की भारतीय संघ आशिया कप 2023 साठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. बीसीसीआयच्या या पवित्र्यानंतर आशिया कप इतरत्र हलवला जाऊ शकतो. मात्र, पीसीबी आशिया चषक पाकिस्तानातच आयोजित करण्यावर ठाम आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अत्यंत प्रेमळ आणि काहीशा गमतीशीरपणे एक विनंती केली आहे.

आफ्रिदी म्हणाला, “पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न आहे, तर अलीकडेच अनेक आंतरराष्ट्रीय संघांनी आम्हाला भेट दिली आहे. दोन्ही देशांच्या सरकारकडून परवानगी मिळाल्यास दौरा होईल. यानंतर आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अत्यंत प्रेमळ आणि काहीशा गमतीशीर स्वरात विनंती केली आहे की, मोदी साहेब क्रिकेट होऊ द्या.”

शाहिद आफ्रिदी ‘स्पोर्ट्स तक’ वर बोलताना म्हणाला, “जर आपल्याला एखाद्याशी मैत्री करायची असेल आणि तो आपल्याशी बोलत नसेल तर आपण त्याबद्दल काय करू शकतो? बीसीसीआय हे एक मजबूत मंडळ आहे यात शंका नाही. जेव्हा तुम्ही मजबूत असता तेव्हा तुमच्यावर अधिक जबाबदारी असते. अधिक शत्रू बनवण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला मित्र बनवण्याची गरज आहे. अधिक मित्र बनवल्याने  तुम्ही मजबूत बनू शकता.”

पीसीबी (PCB) कमकुवत आहेत का? यावर प्रतिक्रिया देताना आफ्रिदी म्हणाला, “मी पीसीबीला कमकुवत म्हणणार नाही, पण समोरूनही प्रतिसाद आला तर बरे होईल. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, तुला माझ्याशी मैत्री करायची नसेल तर मी काय करू.”