माझा नातूदेखील अयोध्येत आहे, हे मलाही माहीत नव्हतं – शरद पवार 

कोल्हापूर  – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असताना भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाचे नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले तरी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याची सध्या बरीच चर्चा सुरु असताना  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की,कुणाचाही अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही. कोण अयोध्येला जाणार आहे, ते मला माहित नाही. काल माध्यमांवरून मला माहिती मिळाली की, माझा नातूदेखील अयोध्येत आहे, हे मलाही माहीत नव्हतं.