हनुमान चालिसा म्हणून काही होत नाही, सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत – पवार

कोल्हापूर – ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवत विनोदी वक्तव्ये केली त्यांच्या विनोदाचा मी आनंद घेतो. अशाप्रकारची वक्तव्य केल्याने लोक हसतात आणि अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत,’ अशा शब्दांत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे (Raj Thackeray) नाव न घेता निशाणा साधला.

साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने सोमवारी आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे व भाजपचा(BJP) समाचार घेतला. ‘ज्यांना समाजात आधार नाही असे लोक काहीतरी वेगळी भूमिका घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भोंगा(LOUDSPEEKER) हा काय मुद्दा असू शकत नाही, पण ज्यांच्याकडे बोलायला कोणताही मुद्दा नसतो ते असं काही तरी बोलत असतात, अशा वक्तव्यांना लोक गांभीर्याने घेत नाहीत,” असेही पवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या दौऱ्याची सध्या बरीच चर्चा सुरु असताना शरद पवार यांनी याबाबत देखील एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, कुणाचाही अयोध्या दौरा(AYODHYA VISIT) हा राष्ट्रीय प्रश्न नाही. कोण अयोध्येला जाणार आहे, ते मला माहित नाही. काल माध्यमांवरून मला माहिती मिळाली की, माझा नातूदेखील अयोध्येत आहे, हे मलाही माहीत नव्हतं.

हनुमान चालिसा म्हणून काही होत नाही. सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत, त्यांना प्रश्न सोडवता येत नाहीत. या सर्व मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी असले मुद्दे पुढे आणले जात आहेत. आज पेट्रोल आणि डिझेल याचे दर किती वाढले आहेत बघा. याबाबत लोकांनी चळवळ उभा केली पाहिजे, असं पवार म्हणाले.