‘ती’ खेळी केली शरद पवारांनी; प्रवीण दरेकरांचा आरोप

कोल्हापूर – संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या अपक्ष उमेदवारीवरून राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच त्यांचे वडील शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी केलेल्या दाव्यामुळे आता संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यातच मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. संभाजीराजेंची व्यक्तिगत उमेदवारी नाकारली गेल्यामुळे घराण्याचा अपमान वगैरे झाल्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिली आहे.

शाहू महाराज म्हणाले, छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा यामध्ये प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. आमच्यामध्ये काही विचार विनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपनं (BJP) दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता, पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील त्यांनी चर्चा केली नव्हती. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं. याशिवाय ही सर्व खेळी फडणवीस आणि भाजप यांची असल्याचा देखील त्यांनी आरोप केला.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ही आमची खेळी नव्हती. राजांचा सन्मान करण्यासाठी सर्वानुमते निघणारा मार्ग होता. त्याच्यामुळे खेळीचा प्रश्न येतो कुठे? खेळी केली शरद पवारांनी. पाठिंबा दिला. दुसऱ्या दिवशी संजय राऊतांना बोलायला लावलं. शिवसेना शिवबंधन बांधायला सांगते, मग यात खेळ्या कुणाच्या? देवेंद्र फडणवीसांना खेळी करण्याची आवश्यकता नव्हती. आम्ही राजांचा सहावर्ष सन्मान केला” असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.