‘फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी, शाब्दिक कोट्या, भावनिक गोष्टी ह्यांनीच महाराष्ट्राची वाट लावली’

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भावनिक आवाहन केले.

दरम्यान, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज? आजही समोर येऊन एकाने सांगितले तरी राजीनामा देण्यास तयार. आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे. पण समोर येऊन बोला.शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नका. माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं…. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या भावनिक आवाहनाची मनसेने खिल्ली उडवली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी, सोशल डिस्टन्स, सहानभूती,नुसत्या शाब्दिक कोट्या, भावनिक गोष्टी,victim कार्ड ह्यांनीच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली. असो या सगळ्यात एक बर झालं मुख्यमंत्रांची करोनाची भीती गेली आणि ते बाहेर पडले. असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे.