देवदेवता, संताचा अपमान करणाऱ्या अंधारेंच्या विरोधात महाभकास आघाडी कधी मोर्चा काढणार?- शीतल म्हात्रे

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात १७ डिसेंबरला मुंबई येथे महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी या महामोर्चाला विरोध दर्शवला असून सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्रही सोडले आहे.

“१७ तारखेला महाभकास आघाडी मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा असणार आहे महापुरुषांच्या अपमानकारक वक्तव्याविरुद्ध. परंतु त्याआधी मला या महाभकास आघाडी आणि उध्वस्त सेनेला विचारायचे आहे की, देवी-देवता, संत महापुरुषांमध्ये येत नाहीत का? कारण तुमच्या उपनेत्या सुषमाताई एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, राम-सीता यांच्याविरुद्ध गरळ ओकतायत. संपूर्ण महाराष्ट्रभर यावरून संतप्त प्रतिक्रिया उटमतायत. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही”, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

“गेल्या काही दिवसांत ही वक्तव्ये चुकीची आहेत किंवा त्याचा विरोध करण्याचा साधा प्रयत्नही तुम्ही दाखवला नाही. आणि आपण महापुरुषांचा अवमान झालाय, त्याविरोधात मोर्चा काढताय. मग भाजपा तुम्हाला एवढेच विचारते की, संतांचा अपमान झालाय, त्याविरुद्धही मोर्चा काढा. तुम्ही फक्त राजकारण करताय, हिंदुत्वाला पाठींबा देत नाहीये, हे लोकांना लक्षात येऊ लागंलय”, असा घणाघातही शीतल म्हात्रेंनी शेवटी केला आहे.