बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रातला; सर्वज्ञानी संजय राऊतांनी दिली चुकीची माहिती

भाजपा नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ चुकवले होते, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विरोधात रान पेटवले होते. परंतु आता खुद्द शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीची माहिती दिली आहे. भाजपाने त्यांची चूक पकडली असून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा चुकीचा इतिहास सांगितल्यावरून आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे. अशातच सर्वज्ञानी संजय राऊत यांनी बाबासाहेबांबद्दल (Babasaheb Ambedkar) महाराष्ट्राला चुकीची माहिती दिल्याने ते विरोधकांनी जाळ्यात सापडले आहेत. “ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. ज्यांनी महाराष्ट्रात लोकशाही जन्माला आणली, त्या महाराष्ट्रात असं घडतंय हे दुर्देव आहे”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

या चुकीच्या वक्तव्यावरून भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “सर्वज्ञानी संजय राऊतजी म्हणताहेत बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला … अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान”, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या खासदारावर निशाणा साधला आहे. 

पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही तर मध्यप्रदेशातील महू येथे झालाय इतकं सामान्य ज्ञान रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणाऱ्या सर्वज्ञानींना असू नये?? आमचे आदर्श असणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेबांबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय?”. तसेच महाविकास आघाडीच्या महामोर्चावरूनही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. “महापुरूषांचा असा अपमान तुम्ही करायचा आणि स्वतःचं मोर्चे काढायचे मुर्ख समजू नका…महाराष्ट्र तुम्हाला पुरतां ओळखून आहे तुमचा जाहिर निषेध ..!”, असे त्यांनी म्हटलं.

दरम्यान भाजपा नेते प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीची माहिती दिल्यानंतर त्यांना विरोधकांनी २ वेळा माफी मागायला लावली होती. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबद्दल विरोधक काय भूमिका घेतील, हे पाहावे लागेल.