भाजपमध्ये धुसफूस : नगर जिल्ह्यात शिंदे- विखे संघर्षाला सुरुवात; शिंदेंच्या असंतोषाचा झाला स्फोट

Ram Shinde – नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. मात्र जरी भाजपच्या ताब्यात बाजार समितीच्या चाव्या आल्या असल्या तरी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.

सुजय विखे पाटील यांचे पीए आणि कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने राम शिंदे यांनी विखेंवर जोरदार टीका केली आणि याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करणार असल्याचे शिंदे म्हणाले. सोबतच विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात हे ऐकलं होतं, आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असंही राम शिंदे म्हणाले.

दरम्यान, आता विखे पाटील या आरोपांवर काय बोलणार आणि भाजप नेतृत्व यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे. तर दुसर्या बाजूला शिंदे- विखे संघर्षाला या निमित्ताने सुरुवात झाल्याचे सध्या चित्र दिसत असल्याचे दिसून येत आहे.