पुण्यातही उभे राहणार शिवसेना भवन; शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची माहिती

पुणे  –मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही शिंदे गटाकडून शिवसेना भवन कार्यालय सुरू केले जाणार आहे. शिवसेना ( शिंदे गट) शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी यासंबंधीची माहिती दिली.

शिवसेनेतून बंडखोरी करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिवसेना भवन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातही नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेना भवन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी शहराध्यक्ष भानगिरे सह संपर्कप्रमुख अजय भोसले, खडकवासला विभाग प्रमुख निलेश गिरमे शिवाजीनगर विधानसभा प्रमुख संजय डोंगरे आदींनी जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात शिवसेना भवनच्या इमारतीची पाहणी केली.

यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना भानगिरे म्हणाले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी हे संपर्क भवन सुरू केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली जाईल. त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारींचेही निवारण या ठिकाणी केले जाईल. येत्या 15 दिवसातच श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर या शिवसेना भवनाच्या कार्यालय सुरू होईल असेही भानगिरे यांनी सांगितले.