शिवसेना- कॉंग्रेसमधील संघर्ष वाढला; काँग्रेसने सुरु केली न्यायालयीन लढाईची सुरुवात

मुंबई – मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत आमच्यावर अन्याय झाला असून शिवसेना योग्य न्याय देत नाही” असा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केला आहे. इतकेच नाही तर काँग्रेसनं कोर्टात जाण्याचीही भूमिका घेतली आहे.पनवेल येथे मुंबई काँग्रेसकडून संकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.

या शिबिराला पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाई जगताप म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेच्या संदर्भात २-३ बैठका झाल्या. आमच्या कुठल्याच मागण्या शिवसेना पूर्ण करत नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. फक्त २३ जागांची आरक्षण सोडत झाली. त्यात २१ काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वार्डात आरक्षण पडले. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) शिवसेनेच्या दबावाखाली काम करतात असा आरोप त्यांनी केला.

आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या परंतु शिवसेनेने न्याय दिला नाही. हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ज्या वार्डात मागासवर्गीयांची संख्या कमी तिथे एससी आरक्षण झालं आहे. यासारखीच बरीच उदाहरण आरक्षण सोडतीत पाहायला मिळतील. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात दाद मागणार असं जगताप यांनी म्हटले आहे.