प्रेषित मुहम्मद यांच्यावरील टिप्पणी भोवली; नुपूर शर्मा 6 वर्षांसाठी भाजपमधून निलंबित

नवी दिल्ली – भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma)  यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाने कारवाई केली आहे. नवीन कुमार जिंदाल (Navin Kumar Jindal) यांनाही पक्षाच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे.

नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत. नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानावर वादाच्या भोवऱ्यात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारा असा कोणताही विचार त्यांचा पक्ष स्वीकारत नाही.

सिंह म्हणाले, ‘भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात प्रत्येक धर्माचा विकास आणि भरभराट झाली आहे. भारतीय जनता पक्षाचा सर्वपंथ समभावावर विश्वास आहे. कोणत्याही धर्माच्या उपासकांचा अपमान भाजपला मान्य नाही.देशाच्या संविधानानेही भारतातील प्रत्येक नागरिकाने सर्व धर्मांचा आदर करणे अपेक्षित आहे.