दे घुमा के! ‘बोलंदाज’ संजय राऊत यांची क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच राजकीय मैदानावर फटकेबाजी करत असतात. आपल्या वक्तव्यांनी ते नेहमीच विरोधी नेत्यांची तोंड बंद करताना दिसतात. मात्र, नाशिक दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांचा बॅट हाती घेऊन फलंदाजी करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. नाशिकपासून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली आहे. नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांच्या हस्ते नाशिकच्या नवीन नाशिक परिसरात असलेल्या एका स्टेडियमवर क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन करण्यात आले. या सामन्यांमध्ये उद्घाटन केल्यानंतर संजय राऊत यांनी क्रिकेट खेळण्याचा (Sanjay Raut Batting Video) आनंद लुटला.

संजय राऊत यांनी बॅट हातात घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरुवातही केली. मात्र दुसऱ्याच बॉलला त्यांची विकेट पडली. पुढे मात्र राऊत यांनी चांगलीच फटकेबाजी करत आपल्यातील क्रिकेट कौशल्य दाखवले.