शिवसेनेचे तब्बल २५ आमदार नाराज; संजय राऊत म्हणाले,’ … यामध्ये काहीही गैर नाही’

मुंबई : महाविकास आघाडीच्या निमित्ताने राज्यात तीन पक्षांचं सरकार आलं असलं तरी अनेकदा त्यांच्यातील वाद उघडपणे समोर येत असतात. मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरीही खरा राज्यकारभार हे राष्ट्रवादीचे नेतेच पाहत असतात असं देखील वारंवार समोर आले आहे. यातूनच मग तिन्ही पक्षांचे नेतेही अनेकदा एकमेकांविरोधात वक्तव्यं करत आरोप प्रत्यारोपांचा फैरी झाडत असतात. त्यातच आता निधीवाटपात भेदभाव होत शिवसेनेचे २५ आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेचे २५ आमदार हे निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज आहेत. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना निधीवाटपात मतभेद होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या काही आमदारांनी जाहीरपणे पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यावर या आमदारांची समजूत काढण्याची जबाबादारी उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदार नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, यासंदर्भात चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल. शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर त्यामध्ये काहीही गैर नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

शिवसेनेच्या आमदारांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात पक्षात चर्चा झाली आहे. २५ किंवा त्यापेक्षा जास्त आमदार निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज आहेत. निधी वाटपातील असंतोषाविषयी हे पत्र आहे. आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर यामध्ये काहीही गैर नाही. राज्यातील प्रत्येक आमदाराचा निधीवर हक्क आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.