26/11 आणि मीडियाचे बेजबाबदार वर्तन

दीपक पाठक – 26/11 च्या बाबतीत मीडियाने संयम बाळगायला हवा होता, मीडियाच्या बेजबाबदार वागण्याचा पोलिसांना मोठा त्रास झाला हे विसरून चालणार नाही. ‘२६/११ कसाब आणि मी’ या रमेश महाले (मुख्य तपास अधिकारी) लिखित पुस्तकात मीडियाच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल भाष्य केले आहे. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अतिरेक्यांशी झगडत असणाऱ्या पोलिसांना मिडिया बरोबर सुद्धा हुज्जत घालावी लागत होती. मिडियाने या हल्ल्याच्या काळात टिआरपीसाठी निष्काळजीपणे पोलिसांच्या व कमांडोजच्या हालचाली प्रसारित केल्याची मोठी किंमत मोजावी लागली.

ब्रेकिंग न्यूज देण्याची घाई, यामुळे अतिरेक्यांना कशी मदत होत होती इथपासून ते दहशतवाद्यांनी मीडियाचा कसा वापर करून घेतला याबद्दल सविस्तर लिहले आहे. आपल्या वार्तांकनाचा देशाच्या विरोधात काम करणाऱ्या शक्ती वापर तर करून घेत नाहीत ना? एवढं जरी त्यावेळी लक्षात आलं असतं तरीही बरीच हानी टाळता आली असती.

या पुस्तकातील ब्रेकिंग न्यूजची डोकेदुखी या प्रकरणातील काही भाग पुढीलप्रमाणे-

कोणत्याही गुन्ह्याबाबतची आपल्याला असलेली माहिती पोलिसांना देणं हे, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, ते कायदेशीर बंधनही आहे. वृत्तपत्रं, वाहिन्यांचे पत्रकारही याला अपवाद नाहीत. पण “२६/११ च्या हल्ल्याच्या तपासात आम्हाला एक जो अनुभव आला, तो मन विषण्ण करणारा होता. २६ नोव्हेम्बर, २००८ रोजी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी मुंबईत विविध ठिकाणी एकाच वेळी हल्ला सुरू करण्यात आला. त्यानंतर २७ नोव्हेम्बर २००८ ला -मध्यरात्री १२ वाजून २६ मिनिटानी पाकिस्तानातून रशियामार्गे विविध वृत्तवाहिन्यांना एक ई-मेल पाठवण्यात आला. [email protected] या ई-मेल आयडीवरून तो समय लाईव्ह, एनडीटीव्ही, एशियन न्यूज, झी नेटवर्क, सीएनएन आयबीएन, आजतक, सहारा समय, इंडिया टीव्ही या वाहिन्यांना पाठवण्यात आला. मात्र एकाही वाहिनीनं पोलिसांना स्वतःहून या ई-मेलची माहिती देण्याचं सौजन्य दाखवण्यात आलं नाही.

‘नरीमन हाऊस’ इथला अतिरेकी इम्रान बाबर आणि होटेल ‘ओबेरॉय मधला अतिरेकी फहादउल्ला या दोघांशी झालेलं दूरध्वनीवरचं संभाषण ‘इंडिया टीव्ही’ नं प्रसारित केलं होतं. या दोघा अतिरेक्यांनी इंडिया टीव्हीशी कसा संपर्क साधला, त्याची घटनासाखळी पाहणं फार उद्बोधक ठरेल. हल्ल्याच्या काळात बहुतांश वृत्तवाहिन्या प्रेक्षकांना काही मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा, अशा आशयाचं आवाहन करत होत्या. त्यासाठी आपल्या कार्यालयाचे दूरध्वनीही पट्टीवर फिरवले जात होते. नेमके हेच दूरध्वनी क्रमांक कराचीतल्या ‘लष्करच्या म्होरक्यांनी मुंबईतल्या अतिरेक्यांकडे पोचवले. त्यामुळेच ‘ओबेरॉय’ आणि ‘नरीमन हाऊस’मधले अतिरेकी त्या वाहिनीशी मोबाईलवरून थेट संपर्क साधू शकले.

यात आणखी एक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो, की ज्या वाहिन्यांची कार्यालयं दिल्लीत आहेत, त्या वाहिन्या मुंबईत संकटात सापडलेल्यांना तिथे बसून काय मदत करणार होत्या. हा आहे. या संभाषणाबाबत संबंधित वाहिनीच्या न्यूज अॅन्कर्सचे जबाब नोंदवून घेण्यासाठी पोलिस निरीक्षक रवींद्र भिडे दिल्लीला गेले होते. त्या वेळी संबंधित प्रतिनिधींना बोलतं करताना भिडे यांना या ई-मेलचा अचानक सुगावा लागला. हा ई-मेल मिळवल्यावर मग उर्वरित वाहिन्यांची नावंही समोर आली. मग हा ई-मेल पाकिस्तानमधून रशियामार्गे पाठवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या हल्ल्या पाकिस्तानचाच हात असल्याचा भक्कम पुरावा आम्ही न्यायालयात सादर करू शकलो.

ज्या रात्री हा ई-मेल या वाहिन्यांना मिळाला होता. त्याच रात्री त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली असती, तर तपासाचं काम अधिक वेगानं झालं असतं. भिडे यांच्यासारख्या चाणाक्ष अधिकाऱ्याच्या नजरेला ही बाब पडली नसती तर कदाचित स्वतःहून आम्हाला याचे माहिती कुणीच पुरवली नसते असं आता मागे वळून पाहताना जाणवतं.