अहमदनगरचे नाव बदलल्यानंतर आता ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयाला दिले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव

मुंबई : बारामती, जि. पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरव म्हणून आज या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती, मंत्री महाजन यांनी दिली.

सन २०१३ च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रूग्ण खाटांचे रूग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सन २०१९ च्या शासन निर्णयान्वये प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी, लोकहिताची कामे केली असून शिस्तप्रिय, कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या अशा राजमातेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री महाजन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.