भारतीय जनता पक्ष – काल, आज आणि उद्या

भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंद आणि उत्साहाचा दिवस. ‘प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः’ या ध्येयाने प्रेरित होऊन देश आणि समाजाच्या कार्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस.

भारत देशाला काही हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. ज्ञान, विज्ञान, परंपरा आणि अध्यात्म ही या इतिहासाची ओळख आहे. ही ऐतिहासिक घोडदौड येत्या काही वर्षांतच भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे देशाला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न पूर्ण करेल. राष्ट्रीयत्व आणि सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व साधनशुचिता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयुक्त वापर आणि वावर होणारी भूमी म्हणजे भारतवर्ष. मुळात भारत देश हा फक्त एक जमिनीचा तुकडा नसून एक जाज्वल्य राष्ट्रपुरुष आहे आणि ह्या सर्व मूलमंत्रांचा अंश जपण्याचा आणि संगोपन करण्याचा दैनंदिन प्रयत्न करणारी संस्था म्हणजे भारतीय जनता पक्ष.

देश स्वातंत्र्य झाल्यावर काँग्रेस पक्षाकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदू समाजाचे हित जपणे या प्राथमिक उद्दिष्टांसाठी १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनसंघाची स्थापना झाली. जनसंघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले गेले. भारतीय जनसंघाने स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका घेतली व यासाठी निदर्शने करताना अटक झालेल्या जनसंघाचे श्यामाप्रसाद अध्यक्ष मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. स्वातंत्र्यानंतर संघ विचारधारेतील हे पहिले बलिदान. त्यानंतर दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी भारतीय जनसंघाला आकार दिला.

१९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. १९६७ सालच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती करत मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये आपले सरकार स्थापन केले.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने जोरदार विरोध केला. त्याला उत्तर म्हणून अटलजी, आडवाणीजी या प्रमुख नेत्यांसह जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात कोंडून ठेवण्यात आलं. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी यांसह अनेक लहान लहान पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी इत्यादी नेते जनता पक्षाचे प्रमुख नेते होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री बनले. परंतु अंतर्गत वैचारिक कलहाने ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले. जनता पार्टीचे विघटन होऊन भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. त्यानंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार निवडून आले. दोन खासदारांपासून सुरू झालेला हा प्रवास 303 खासदार निवडून येत स्वबळावर सरकार स्थापन करत पूर्ण झाला. या दरम्यान पक्षाला लालकृष्ण आडवाणी, व्यंकय्या नायडू, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांचे नेतृत्व लाभले.

2014 साली नरेंद्र मोदी यांनी प्रचंड बहुमत मिळवत पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तेव्हापासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास- सबका प्रयास या तत्वानुसार देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक प्रयत्न केले. यादरम्यान भारतीय जनता पक्षाला अमित शाह आणि सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे प्रभावशाली नेतृत्व लाभले. गेल्या 9 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक आघाड्यांवर काम केले त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे, देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी कठोर कारवाई करणारे धाडसी पाऊल उचलून अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा सुवर्णकाळ या देशातील जनतेला दाखवला. राष्ट्रवाद हा आमच्या विचारांचा आत्मा आहे. आधी राष्ट्र सर्वोपरी आहे. देश सुखी, समृध्द आणि शक्तिशाली झाला पाहिजे यासाठीच या विचारांचा अट्टहास आहे.

काँग्रेसच्या काळात साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाही या देशात फोफावली होती. पण या तीनही वादातील द्वंद्व संपुष्टात आणून पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या सामाजिक व आर्थिक चिंतनावर आधारित अंत्योदयाचा विचार भाजपाने मांडला आणि त्याच विचारावर आजही कार्य सुरु आहे. या देशात शेवटच्या स्थानावर असलेल्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहचवणे, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा सर्व देशवाशीयांच्या पूर्ण होईपर्यंत त्यांची सेवा करण्याचा हा विचार आहे. एक सामाजिक पक्ष म्हणून गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून आम्ही काम करीत आहोत आणि भविष्यातही करत राहू.

देशातील सांप्रदायिकता, जातीयवाद समाप्त होऊन सामाजिक समरसता प्रस्थापित झाली पाहिजे, या विचाराने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करत असतात. पण काँग्रेसने केवळ अल्पसंख्यकांची मते मिळावी म्हणून भारतीय जनता पक्षाबद्दल अपप्रचार केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनधन योजना आणली. 35 कोटी लोकांनी खाते उघडले आणि त्यांच्या खात्यात सरळ रक्कम जमा झाली. त्यावेळी सरकारने जातीपाती पाहिल्या नाहीत. 9 कोटी महिलांना उज्वला गॅस सिलेंडर व शेगडी दिली, त्यावेळी सरकारने कुणाला जात विचारली नाही. सामाजिक शोषणाविरुध्द आणि अन्यायाविरुध्द हे सरकार काम करीत आहे. पण मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्यकांच्या मनात भाजपाबद्दल भीती निर्माण करण्याचे नेहमी काम काँग्रेस पक्ष करीत असतो.

आमच्यासाठी अयोध्येतील राम मंदिर हा जेवढा वैचारिक विषय आहे, तेवढाच भावनिक विषय आहे. अखंड भारताचे असलेले अयोध्येतील भव्य राम मंदिराचे स्वप्न पुढील काळात लवकरच पूर्ण होणार आहे. जम्मू काश्मीरचे 370 वे कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा शासनाने घेऊन जम्मू काश्मीरला स्वातंत्र्य दिले. काँग्रेसने मात्र अल्पसंख्यकांच्या दबावात आणि मतांच्या राजकारणासाठी 370 कलम रद्द करण्याचा निर्णय कधीच घेतला नाही व भविष्यातही घेतला नसता.

अतिरेक्यांविरुध्द कडक कारवाई करून काश्मीरमध्ये व देशाच्या अंतर्गत भागात शांतता प्रस्थापित करण्याचे काम भाजपा सरकारने केले. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी हे सरकार कटिबध्द आहोत. या देशाला सुखी, समृध्द, शक्तिशाली, सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सुशासन आणि विकासाची कास या सरकारने धरली असून त्या दिशेने काम सुरु आहे.

भारताला ‘विश्वगुरू’ बनवायचे असेल तर त्यासाठी सामाजिक समरसता अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्यायाची वागणूक देणे तर्कसंगत आहे. हा विचार भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहेच. तो अधिक प्रगल्भ व्हावा यासाठी आजपासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत सामाजिक समरसता सप्ताह साजरा केला जाईल. आणि दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाचा आत्मा असणारा ‘तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे ना रहे।’ हा विचार देशवासियांपर्यंत पोहचवला जाईल.