Sunil Tatkare | मी आपले आभार नाही तर सगळ्यांचे ‘ऋण’ व्यक्त करायला आलोय

Sunil Tatkare | मी आपले आभार नाही तर सगळ्यांचे ‘ऋण’ व्यक्त करायला आलो आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

रायगड लोकसभा मतदारसंघात मोठया मताधिक्याने विजयी झालेले खासदार सुनिल तटकरे यांनी आज पेण येथून आभार दौऱ्याची सुरुवात केली.माझ्या आयुष्यातील ही कसोटीची पहिली निवडणूक होती असे सांगतानाच रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदार सुज्ञ आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. राज्यात काही झाले तरी रायगड मतदारसंघात नक्कीच चमत्कार घडेल असा विश्वास होता आणि मला इथल्या जनतेची, मतदारांची भक्कम साथ मिळाली त्याबद्दल जाहीर आभारही सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी मानले.

पेणकरांनी पहिल्या फेरीपासून माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या विजयात मोलाचा वाटा ठरला आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी पेण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे ऋण व्यक्त केले. देशात वेगळे वातावरण निर्माण करण्याचे काम इंडी आघाडीने केले. संविधान बदलाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. अल्पसंख्याक, आंबेडकरी जनता आणि आदिवासी समाज महायुतीपासून दुरावला गेला मात्र पेणकरांनी मला भक्कम आधार दिला असेही सुनिल तटकरे म्हणाले.

२०१४, २०१९ मध्ये मताधिक्य कमी होते मात्र त्याची भरपाई २०२४ मधील निवडणूकीत देऊन पेणकरांनी विक्रम केला आहे. ज्यांच्यामुळे लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणार आहे त्या सर्वांसमोर सुनिल तटकरे विनम्र झाले.पेणकरांची पाण्याची समस्या आहे. पेणकरांचा पाण्याचा जो काही प्रस्ताव असेल आणि जेवढे विकासकामांसाठी प्रस्ताव येतील त्या सर्व विकासकामांना अजितदादांच्या माध्यमातून निधी दिला जाईल असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

या मतदारसंघात आमची जागा पराभूत होईल असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले असतानाही तुम्ही मताधिक्य दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा पेणकरांचे सुनिल तटकरे यांनी आभार मानले. शेतक-यांच्या मनात जे स्थान असेल तेच काम महायुतीचे सरकार करेल आणि तुम्ही जी कामे द्याल ती प्राधान्याने करु त्यात पेणकरांना झुकते माप दिले जाईल असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

देवेंद्र आले… त्यांनी पाहिले… त्यांनी जिंकले… त्यांची पेण इथे ऐतिहासिक सभा झाली आणि इथेच विजयाचा पाया रचला गेला असेही सुनिल तटकरे यांनी आवर्जून स्पष्ट केले.जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या की अलिबागवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आणि अशी सत्ता घ्यायची की पुन्हा कुणी परत नाव काढता कामा नये असा उपरोधिक टोलाही सुनिल तटकरे यांनी शेकापला लगावला.

एकोप्याने काम कसे करायचे याचे चित्र पेण मतदारसंघात पहायला मिळाले असे सांगतानाच माझ्या विजयाचे पहिले शिल्पकार या पेणचे मतदार आणि आमदार रविंद्र पाटील, धैर्यशील पाटील आहेत असेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

१९५२ नंतर पहिल्यांदाच पेण मतदारसंघाने जर कुणाला मताधिक्य दिले असेल तर ते सुनिल तटकरे यांना असेही आमदार रविंद्र पाटील यांनी सांगितले.

राज्यात सुप्त लाट असतानादेखील पेणकरांनी जो ‘पण’ केला तो ‘पण’ आपण पूर्ण केल्याबद्दल आमदार रविंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. आपण एकत्रित असलो तर कुणाची हिम्मत नाही आपल्याला हरवण्याची.. सर्वांनी एकत्र येऊन विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जिंकायच्या आहेत असे आवाहन आमदार रविंद्र पाटील यांनी यावेळी केले.

पेण तालुक्याने शहरासह २१ हजाराचे मताधिक्य दिले आहे त्याबद्दल आमदार अनिकेत तटकरे यांनी जनतेचे आभार मानले. जो शब्द निवडणूक कालावधीत दिला आहे तोच शब्द निकालानंतर कायम राहिल असा विश्वास देतानाच येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा एकदा आणायचे आहे असे आवाहन अनिकेत तटकरे यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप