Sunil Tatkare | अलिबागमध्ये पिछाडीवर राहिन असा अपप्रचार खोडण्याचे काम केल्याबद्दल तुमचा कायम ऋणी राहिन

Sunil Tatkare | अलिबागमध्ये पिछाडीवर राहिन असा अपप्रचार सुरू होता मात्र हा अपप्रचार खोडून काढण्याचे काम अलिबागकरांनी केले त्याबद्दल अलिबागकरांचा कायम ऋणी राहीन असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अलिबागकरांचा दिला.

मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस संपले हे अलिबागकरांनी दाखवून दिले आहे. ज्यांची मक्तेदारी होती ती मक्तेदारी मोडून काढण्याचे काम अलिबागने केलेच शिवाय मताधिक्यही दिले याचा अभिमान सांगताना महायुती आजही आणि उद्याही एकत्र राहणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अलिबागच्या शिवतीर्थावर महायुतीचाच झेंडा फडकवायचा असे आवाहन सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी केले.

आयुष्यातील ही आठवी निवडणूक होती पण विचार करायला लावणारी होती. संविधान बदलाबाबत शंका निर्माण करण्यात विरोधकांना यश आले ते दूर करायला महायुतीला कालावधी मिळाला नाही. आपल्या महायुतीचे पदाधिकारी मतदारांपर्यंत पोचले म्हणूनच ८२ हजाराचे मताधिक्य मिळाले असे सांगतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण येथे सभा झाली आणि रायगडचा विजय निश्चित झाला होता असेही सुनिल तटकरे म्हणाले.

राजकीय जीवनात काम करताना नेहमी संयमाची भूमिका घ्यायची असते. राजकीय टिकेला सामोरे गेलो परंतु संयम कधी सोडला नाही. मोर्बे येथे विरोधकांची सभा झाली आणि अल्पसंख्याक समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर काही न बोलता संयम ठेवून काम केले आणि यश मला मिळाले असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

दिल्लीत देशातील एनडीएचे २१ नेते पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित त्यात तुमचा खासदार सुनिल तटकरे उपस्थित होता याचा मला अभिमान आहे असे सांगतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चहापान कार्यक्रमात मला ‘सुनिल काहीतरी घ्या’ असे मराठी भाषेतून बोलले याचा मला अभिमान वाटला. इतका मोठा नेता मला नावाने हाक मारून चौकशी करतो शिवाय माझ्या मुलीचीही विचारपूस करतात त्या शब्दांनी माझ्या अंगावर रोमांच उभा राहिला. हे अनुभव तुमच्यामुळे मला घ्यायला मिळाले आहे असेही सुनिल तटकरे यांनी आलेल्या अनुभवाचे कथन केले.

विरोधकांनी कुणाच्या नावाने निवडणूक लढली नव्हती मात्र आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नावावर निवडणूक लढलो याचा आम्हाला अभिमान आहे असेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

कामाच्याबाबतीत तुम्ही निर्धास्त रहा. अलिबागकरांनी भरभरून प्रेम दिले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो असलो तरी मी महायुतीचा खासदार म्हणून काम करणार आहे असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

मला मंत्री होण्यापेक्षा आज माझ्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातील विधानसभा हे लक्ष्य आहे. राज्यात पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने महायुतीचे सरकार आणायचे आहे त्यासाठी आतापासून जोरदार प्रयत्न करत असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

माझ्या पदरात अभूतपूर्व यश अलिबागमध्ये मिळाले आहे. त्यामुळे इथे रोजगाराची साधने आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप