महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात मोदी सरकार अपयशी, मणिपूरमध्ये नग्नावस्थेत महिलांची काढली धिंड

मुंबई: मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्याच्या बातम्या समाज माध्यमांवर (Manipur Voilence) व्हायरल झाले आहेत. अशा घृणास्पद कृत्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ठाम भूमिका घेतली आहे आणि देशभरातील महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार व कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

धक्कादायक व्हिडिओचा देशभरातील नागरिकांकडून संताप आणि व्यापक निषेध व्यक्त केला आहे. महिलांवरील अशा भयंकर अत्याचारांकडे समाजाने प्रेक्षकाच्या भूमिकेत राहू नये व त्यावर सरकारला जाब विचारण्याची भूमिका समाजाने घेतली पाहिजे अशी प्रखर मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

महिलांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी शासनाने कठोर पावलं उचलावी तसेच भारतीय समाजाला या विषयावर सचेतन करण्याची आवश्यकता असल्याचे महेश तपासे मुख्य प्रवक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी बोलून दाखवले.

महिलांच्या प्रतिष्ठेचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण हा जन्मजात मानवी हक्क आहे व ह्यासोबत तडजोड केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारच्या हिंसेमुळे आपल्या समाजाच्या नैतिक जडणघडणीला तर हरताळ फासला जातोच पण जागतिक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमाही कलंकित होते असेही तपासे पुढे म्हणाले.

समाजातील महिलांच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम आहे
महिलांवरील हिंसाचार आणि भेदभावाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सरकार, नागरी समाज यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याचे आव्हान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.