“मला इथून पुढे मुलं झाली तर…”, ब्राह्मण महासंघाच्या आव्हानावर छगन भुजबळांचा पलटवार

ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं करणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. हिंदू महासंघाने छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवताना म्हटले की, छगन भुजबळांनी आज पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. मुळात भुजबळ यांचं हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीला बदनाम करण्याचं धोरण का असतं? हा आमचा पहिला प्रश्न आहे. तसेच भुजबळ यांनी त्यांच्या घरात किती शिवाजी आणि संभाजी नावाचे लोक आहेत ते सांगावं.

तुम्ही तुमच्या मुलांची नावं शिवाजी किंवा संभाजी अशी का ठेवली नाही? तुम्ही ओबीसी समाजाचं राजकारण करताना मराठा समाजाला नावं का ठेवता? भुजबळ यांचं हे वक्तव्य मुर्खपणाचं आहे असं आम्ही (हिंदू महासंघ) मानतो. अनेक जातींमध्ये शिवाजी आणि संभाजी अशी नावं असलेली वेगवेगळी माणसं आम्ही दाखवू शकतो. परंतु, येथे व्यक्तीशः उल्लेख करणं योग्य नाही. छगन भुजबळ तुम्हाला अशी नावं सापडली नाहीत तर आम्ही का देऊ. इतरांवर बोलण्याआधी छगन भुजबळ यांनी आधी स्वतःच्या घरातली नावं बदलावी. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचं नाव बदला आणि शिवाजी भुजबळ करून दाखवा, त्यानंतर आमच्याशी बोला, असे छगन भुजबळ यांना उद्देशून आनंद दवे म्हणाले होते.

छगन भुजबळ यांचे आनंद दवेंना प्रत्युत्तर
आता छगन भुजबळ यांनी आनंद दवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. सकाळी प्रसारमाध्यमांसमोर येत ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना भुजबळ म्हणाले, मी माळ्याच्या जातीत जन्माला आलो आहे. या जातीत अनेकांची नावं शिवाजी, संभाजी आहेत. आमच्या जातीत शिवाजी, संभाजीसह नेताजी, संताजी, धनाजी अशी सगळी नावं आहेत.

आता मला पुढं जर मुलं झाली तर त्यांची नावं मी नक्कीच शिवाजी आणि संभाजी अशी ठेवेन. काही लोक आता मला उपदेश करत आहेत, काहींनी वर्तमान पत्रातून मला उपदेश केले आहेत, ते म्हणतायत तुम्ही तुमच्या मुलांची नावं शिवाजी संभाजी का नाही ठेवली? अरे माझ्या समाजात, बहुजन समाजात सगळीकडे शिवाजी महाराजांपासून सगळ्या थोर व्यक्तिंची नावं आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.