उर्फीप्रकरणी सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीसांवर निशाणा! स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत म्हणाल्या, ‘नंगटपणा..’

Mumbai- गेल्या काही दिवसांपासून भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात सोशल मीडिया वॉर सुरू आहे. उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. यावर उर्फीनेही माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत मला तुरुंगात पाठवण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे. या दोघींमधील वाद चांगलाच पेटत असताना ठाकरे गटाच्या फायरब्रँड महिला नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.

सुषणा अंधारे यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत ‘नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो’, अशा शब्दांत त्यांची कानउघडणी केली आहे.

‘मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच,’ असं सुषमा अंधारेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

पुढे त्या लिहितात, ‘अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया. पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेदसारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?’

‘आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत (Kangana Ranaut), केतकी चितळे (Ketaki Chitale) किंवा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना (म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना) मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.’ अशा तिखट शब्दांत त्यांनी चित्रा वाघ यांना झापले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid09FRB7yFdYrcADZbFjv2eSjZJ6KB1DSMyLsGfuMUt3VuThUhqJACuHTdaDwwVzFxQl&id=100000324369123&mibextid=Nif5oz