दु:खद बातमी! जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल (Tabassum Govil) यांचे निधन झाले आहे. तबस्सुम या ७८ वर्षांच्या होत्या. तबस्सुम यांना शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तबस्सुम यांच्या निधनाबद्दल त्यांचा मुलगा होशांगने माध्यमांना माहिती दिली आहे. तबस्सुम यांच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

कोण होत्या तबस्सुम?
तबस्सुम यांनी 1947 मध्ये आलेल्या ‘नर्गिस’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्या मेरा सुहाग, मंझधर, बडी बहन आणि दीदारमध्ये दिसल्या होत्या. लता मंगेशकर यांनी गायलेले ‘बचपन के दिन भुला ना देना’ हे गाणे तबस्सुम यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. ‘बैजू बावरा’ या चित्रपटात त्यांनी मीना कुमारीची बालपणाची भूमिका साकारली होती.

काही वर्षे चित्रपटांतून ब्रेक घेतल्यानंतर तबस्सुम यांनी पुनरागमन केले होते. पुनरागमनानंतर त्यांनी भारतीय टेलिव्हिजनचा पहिला टॉक शो ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ होस्ट केला होता. हा शो 21 वर्षे (1972 ते 1993) चालला. तबस्सुम यांनी या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या होत्या, ज्यामुळे त्या अधिकच खूप लोकप्रिय झाल्या होत्या.

1985 मध्ये त्यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक म्हणून पहिला चित्रपट प्रदर्शित केला होता. त्याचे नाव होते ‘तुम पर हम कुर्बान’. 2006 मध्ये त्यांनी टीव्हीवर पुनरागमन केले होते. तबस्सुम यांनी ‘रामायण’ मालिका फेम अभिनेता अरुण गोविलचा मोठा भाऊ विजय गोविलसोबत लग्न केले होते. त्यांना होशांग गोविल नावाचा मुलगा आहे.