अवैध वाळू उपसा करुन शासनाचा महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करा – बाबाजानी दुर्राणी

मुंबई – परभणी (parbhani) जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील डाकूपिंपरी येथे अधिकारी आणि वाळू तस्कर यांनी संगनमत करुन शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याची बाब आमदार बाबाजानी दुर्राणी (MLA Babajani Durrani) यांनी विधानपरिषदेत सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

वाळू माफिया आणि वाळू तस्कर यांचा राज्यात सुळसुळाट झाला आहे. वाळू कंत्राटदार हे विविध नावाने वाळूचे कंत्राट घेतात. महसूल प्रशासनाकडून वाळू उपसाची जेवढी परवानगी दिली जाते, त्याहून कितीतरी अधिक पटीने वाळू उपसा केला जातो, याकडे बाबाजानी दुर्राणी यांनी लक्ष वेधले. या कंत्राटदाराला प्रशासनाने १ कोटी २८ लाखांचा दंड ठोठावला आहे. हा दंड कधी वसूल करणार, असा प्रश्नही आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विचारला.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उत्तरात संबंधित वाळू कंत्राटदारांना दंड भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच रात्री वाळू उपसा करण्याच्या धोरणाचा राज्य सरकार पुनर्विचार करत असल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी जेसीबी (JCB) लावून वाळू उपसा केला जात आहे. बेकायदेशीरपणे हे साहित्य वापरत असल्यास भविष्यात हे साहित्य जप्त करण्यात येईल, असे उत्तरही विखे पाटील यांनी दिले.