शिंदे साहेब …तुम्ही इकडे या… या बाजुला  तुम्हाला मुख्यमंत्री करायला अडचण येणार नाही.. ; जयंत पाटलांची ऑफर 

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुरत लूटली… त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेलात… तुमची सुरतेवर स्वारी झाली परंतु त्याने महाराष्ट्राची बदनामीच झाली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधारी मंत्र्यांना, आमदारांना तर कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना चिमटे काढले तर कधी मिश्किल आणि खोचक टिप्पणी केल्याने सभागृहात एकच हंशाच हंशा पिकला होता.

८० टक्के मार्क मिळालेल्यांनी २० टक्के मार्क असलेल्या लोकांना पाठिंबा दिला याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच चिमणआबा तुम्ही गुवाहाटीत पहिल्या लॉटमध्ये गेलात… ससा आणि कासवाची कथा तुम्हाला माहीत आहे. गुलाबराव माहित आहे की नाही असा त्यांच्याकडे बघत सवाल केला आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) उशिरा आले आणि पहिले मंत्री झाले आणि चिमणआबा मात्र पाठीमागे राहिले व मंत्री झालेच नाहीत. यांच्यासाठी कोणते मेरीट लावले असा सवालही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. गुलाबरावांना मंत्री केलं त्याला विरोध नाही पण चिमणआबा काय झाले तुमचे… शिरसाटांना मंत्री का केले नाही आता कसं अडजेस्ट करणार त्यांना… संघाचे काम नाना किती वर्ष केलं तुम्ही… नानांची निष्ठेची टोपी बाहेर ठेवली गेली आणि कॉंग्रेसकडून (Congress) आलेल्या सत्तारांना मंत्री केले.. नानांसारख्या ज्येष्ठ माणसाचा विचार का केला नाही.. दादा भुसे (Dada Bhuse) चांगलं कृषी मंत्री म्हणून काम केलं असताना  त्यांना कुठलं खातं दिले असे टिकात्मक आणि मिश्किल चिमटे जयंत पाटील यांनी काढले.

हे सरकार अस्तित्वात येत असताना काय घडलं… सध्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) केस सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन काम करा असे एकनाथ शिंदे यांना सांगतानाच सध्या तुम्ही त्यांना विश्वासात घेत नाही असं एकंदरीत दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतले ते त्यांना माहीत नसते असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. बच्चू कडू सध्या अडीच वर्षे सह्यांवर दिवस काढतील असं वाटतं…. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणार पण कधी पाळणार… हल्ली तुम्हाला घेरलेले आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेट करा असा सल्लाही दिला.

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही अनैसर्गिक युती होती असं बोलता. आमच्या बरोबर होता त्यावेळी असा शब्द काढला नाही.. भाजपसोबत (BJP) युती नैसर्गिक युती आणि आमच्या सोबत अनैसर्गिक युती हे कसं काय… निवडणुका झाल्यावर युत्या होतात परंतु आमची झाली ती अनैसर्गिक युती कशी काय? याआधीही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी प्रतिभाताई यांना राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांच्या वेळी पाठिंबा दिला होता. ज्यावेळी महाराष्ट्राला गरज होती तेव्हा शिवसेना सत्याच्या बाजूने उभी राहिली आहे हेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

शिवसेना – भाजप (Shiv Sena – BJP) नेत्यांमध्ये बंद खोलीत काय चर्चा झाली यावर बोलत असताना भाजपचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांनी तुम्ही त्या बैठकीत होतात का अशी विचारणा केली त्यावेळी जयंत पाटील यांनी गोरे तुम्ही त्यावेळी आमच्या बैठकीत होतात असा टोलाही लगावला…

एकनाथ शिंदे व फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे यांची मध्यंतरी एक क्लीप आली होती भाजपचा अन्याय सहन होत नाही असं बोलून राजीनामा देत आहोत असे उध्दव ठाकरे यांना सांगितले त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केले तेव्हा एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांच्या वेदना दिसल्या नाही का ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. भाजपचा एक मुख्यमंत्री होणारा नेता… पक्षात ताकद वाढणारा नेता…पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधील नेता होता… परंतु असाही योग येऊ शकतो त्या नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाते हा महाराष्ट्राचा अपमान केला आहे हे भाजपच्या लक्षात कसं येत नाही असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला..

खातेवाटपात काय झालं.. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केवढा अन्याय… या मंत्रीमंडळात एकच ध्रुवतारा तो म्हणजे गुलाबराव पाटील… त्यांचे पाणी पुरवठा खाते कुणी बदलले नाही… शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांना एक्साईज खातं दिलं… ते खातं गणेश नाईक यांच्याकडे होते त्यामुळे तुम्हाला ते चांगलं वाटणार नाही मंदाताई यांना चांगलं माहिती आहे…

एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते…त्यावेळी एक फोटो आला होता… औरंगजेबाच्या दरबारात शेवटच्या रांगेत छत्रपती शिवाजी महाराजांना उभे करण्यात आले तो अपमान समजून छत्रपती शिवाजी महाराज थेट निघून आले होते हे माहीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागच्या रांगेत उभे असलेले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले हा महाराष्ट्राचा अपमान आहे सांगून त्यांनी बाहेर पडायला हवे होते असा टोला लगावताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागच्या रांगेत का होतो याचा खुलासा करावा लागला.

मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही इकडे या… या बाजुला  तुम्हाला मुख्यमंत्री करायला अडचण येणार नाही.. शिवसेनेपासून हिंदूत्व (Hinduism) लांब जाणार नाही. त्यामुळे हिंदू देवतांच्या जमीनी लुटणाऱ्या लोकांची चौकशी आम्ही लावली होती परंतु या प्रकरणाचा तपास संपत आलेला असताना चौकशी अधिकारी का बदलण्यात आला. तुमच्या सहकार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का… प्रामाणिकपणे चौकशी होत असताना अधिकार्‍यांना का बदलत आहेत असा सवालही जयंत पाटील यांनी सरकारला केला.

आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) हे कोट शिवून कधीचेच बसले आहेत… पाठीमागे सगळेच समदु:खी बसले आहेत… समदु:खी लोकांची एक लाईन तयार करा… असा जबरदस्त टोलाही लगावला…तुम्ही तिकडे गेलात कधी तरी वातावरण बदलले तेव्हा इकडे याल… विस्तार होईल तेव्हा होईल.. त्या विस्तारात कुणाला जागा मिळेल अथवा न मिळेल परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे असंतुष्ट आत्मे आहेत त्या ४० च्या ४० लोकांना मंत्री करा… तर तुमचं चांगलं होईल… आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही असा टोलाही लगावला.

महागाई किती वाढली आहे हे गोरगरीबांच्या घरात जाऊन पहा. घरगुती गॅस, खाद्यतेल, धान्य सर्वच गोष्टी महागात होत आहेत. पेट्रोल – डिझेलचे दर तर रोजच वाढत आहे. एकनाथ शिंदे यांनी नवे सरकार येताच तडकाफडकी ५ रुपये पेट्रोलवरील कर कमी केले मात्र हे सरकार तो खड्डा लवकरच भरून काढेल असा टोलाही लगावला.

जीएसटीचा (GST) इतका अतिरेक झाला आहे की प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला जात आहे. चप्पल घातली तर जीएसटी, कपडे घातले तर जीएसटी. एक कुटुंब जेवायला बसले की त्यात एक ताट हे जीएसटीच्या नावे केंद्र सरकारला ठेवावे लागते. राज्य सरकार महागाईवर फार हस्तक्षेप करू शकत नाही मात्र राज्य सरकारने केंद्रसरकारकडे कपडे, खाद्यपदार्थ यावर जीएसटी हटवण्याची विनंती करावी असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.