समान नागरी कायद्याला ठाकरे गट पाठींबा देणार ?

Uniform Civil Code News: समान नागरी संहिता (यूसीसी) बाबत देशात गोंधळ सुरू आहे. या मुद्द्यावर पीएम मोदींच्या वतीने वक्तव्य दिल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. या मुद्द्यावर काही विरोधी पक्ष केंद्र सरकारला पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान, शुक्रवारी (३० जून) उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी संहिता लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी UCC ला विरोध केला आणि आरोप केला की हा मुद्दा मांडण्यामागे भाजपचा निवडणूक अजेंडा आहे आणि केंद्र सरकारला त्याची अंमलबजावणी करण्यापासून मागे हटण्याची विनंती केली. दरम्यान, UCC वर केंद्र सरकारला उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना (UBT) देखील पाठिंबा मिळू शकतो. समान नागरी संहितेबाबत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, मात्र हे विधेयक संसदेत आणल्यास उद्धव ठाकरेंचा पक्ष त्याला पाठिंबा देईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल सिंह यादव यांनी भाजपवर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समान नागरी संहितेबाबत खोटा प्रचार केल्याचा आरोप केला. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर म्हणाले की, समान नागरी कायदा हा धार्मिक मुद्दा नाही, तर समान हक्क, न्याय आणि महिलांच्या सन्मानाचा मुद्दा आहे.