कुणी शिवरायांशी केली तुलना, तर कुणी वापरली शिवराळ भाषा; ‘या’ नेत्यांनी केली सर्वात वादग्रस्त वक्तव्ये

मागील महिन्यापासून सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. काही नेत्यांनी तर बेताल वक्तव्ये करत नवा वाद निर्माण केला. या विशेष लेखात आपण, अशा काही नेत्यांचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी गेल्या महिन्याभरात सर्वात वादग्रस्त भाष्ये केली आणि वर्षभर त्यांची चर्चा झाली.

गेल्या महिनाभरात सर्वात वादग्रस्त वक्तव्ये केलेले नेते

भगत सिंह कोश्यारी– या यादीत सर्वात आधी नाव येते, ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे. राज्यपाल कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाबद्दल अभद्र विधान केले होते. यामुळे राज्यपाल वादात सापडले होते. हा वाद संपतो तोवर राज्यपालांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरींसोबत नव्या वादाला तोंड फोडले.

शिवाजी महाराज महाराष्ट्राचे जुने आदर्श, सध्याचे आदर्श नितीन गडकरी आहेत, असे विधान राज्यपाल कोश्यारींनी केले होते. या विधानामुळे राज्यपालांवर प्रचंड टीका होत आहे. शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे नेत्यांनी राज्यपालांची कानउघडणी केली. अगदी राज्यपालांना या पदावरून हटवण्याची मागणीही काही नेत्यांकडून करण्यात आली. राष्ट्रवादी आणि स्वराज्य संघटनांकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला.

अब्दुल सत्तार– राज्यपाल कोश्यारींनंतर या यादीत शिंदे गटातील नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राच्या राजकारणात खोक्यांची चर्चा सुरू असताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर केला होता. सुप्रिया सुळेंनी खोक्यांवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी “इतकी भि** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं विधान केले होते.

या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील घरापुढे मोर्चा काढला होता. त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली होती. त्यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती. तसेच अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.

मंगलप्रभात लोढा- भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या चर्चा ताज्या असताना मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केली होती.

जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होत, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं विधान पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं होतं. ज्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

हा वाद वाढल्यानंतर मात्र मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले होते. छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले होते.

संजय गायकवाड- मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना शिवरायांशी केल्यानंतर असेच काहीसे वक्तव्य करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही नवा वाद निर्माण केला होता. त्यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली होती. ज्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना चांगलाच सुनावले होते.