अब होगा तांडव …: भाजपने जे मतदारसंघ जिंकले त्या ठिकाणी ताकत वाढवण्याचे ठाकरेंचे आदेश

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडीला खिंडीत पकडण्याचे काम जोरदारपणे सुरु आहे. या प्रयत्नांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात यश देखील आल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या राज्यात वाढलेल्या कारवाया, रोज समोर येणारी भ्रष्टाचाराची नवीन प्रकरणे या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडी आणि त्यातही शिवसेना चांगलीच जेरीस आली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकत वाढण्यासाठी तसेच पक्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी आता शिवसेना प्रयत्न करत आहे. यातूनच आता शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. यानिमित्ताने आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी आज संवाद साधला. विरोधकांच्या मतदारसंघात शिवसेना वाढवा असे आदेश देतानाच शिवसंपर्क अभियानाचं मिशन यशस्वी करूनच या, अशा शुभेच्छाही त्यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र हिंदुत्वाच्या विचाराने कसा पेटला हे दाखवून द्या. महाराष्ट्राच्या नादाला लागू नका हे दिल्लीकरांनाही कळू द्या. शिवसेनेच्या भगव्याला बदनाम करणाऱ्यांना नेस्तनाबूत करा. भाजपने जे मतदारसंघ जिंकले त्या ठिकाणी जोरात तयारी करा. भाजपची जिथे ताकद आहे तिथे आपली ताकद वाढली पाहिजे. शिवसेना अंगार आहे, भाजप भंगार आहे हे दाखवू द्या, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

विरोधकांची हवा पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. लोकांनाही विरोधकांचे डावपेच लक्षात येत आहेत. यूपीमध्ये भाजपचे आधीपेक्षा आकडे कमी झाले आहेत, हे लक्षात ठेवावं असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या 12 आमदारांच्या फाईलवर अद्याप निर्णय नाही. हे लोकशाहीला न पटणारं आहे. आता आपण घराघरात जाणार आहोत, आपलं कामं लोकांना सांगा, आपण घेतलेलं निर्णय घराघरात पोहोचवा असे ठाकरे यावेळी म्हणाले.