एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई  –  राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रस्तावावर विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आघाडीसाठी अनुकुलता दर्शविली आहे.

दरम्यान, या ऑफरमुळे शिवसेनेवर टीका होऊ लागली असून भाजपच्या नेत्यांनी सेनेला चांगलेच खिंडीत पकडल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला आता शिवसेनेकडून देखील भाजपकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी या ऑफरवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला  असून एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

ठाकरे म्हणाले,  शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा”. तसंच यावेळी त्यांनी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, “मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत”.