उद्धव ठाकरेंना भेटून असं काही सांगणार ज्यामुळे संजय राऊत चपलेने मार खाणार- नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जळजळीत शब्दात टीका केली आहे. यासोबत लवकरच  ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.   उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे, त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने झोडतील, अशी जहरी टीका राणे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करत आहेत. मात्र त्यांना फक्त टीका करता येते. त्याचं योगदान काय? राऊत हे आजच्या राजकारणातील जोकर आहेत. संजय राऊत जे बोलायचे ते मी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. तसेच त्यांनी ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो संपला असा हल्लाबोल नारायण राणे यांनी राऊतांवर केला आहे.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांना एकटं फिरण्याचं आव्हान दिलं होतं. ते चॅलेंज राणेंनी स्विकारलं आहे. “तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते!”, असं प्रति आव्हानच नारायण राणे यांनी दिलं आहे. त्यामुळे राणे आणि राऊत यांच्यातील वाद अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.